प्रधानमंत्री जनमन योजनेच्या अंमलबजावणीसाठी भोर तालुक्यात सर्वेक्षणाला सुरूवात

पुणे : केंद्र शासनाने आदिवासी बांधवांच्या उत्कर्षासाठी ‘प्रधानमंत्री जनमन योजना’ सुरू केली असून भोर तालुक्यात योजनेच्या अंमलबजावणीसाठी सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली आहे.

योजनेचा लाभ नागरिकांना देता यावा यासाठी त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याच्यादृष्टीने सर्वेक्षणात माहिती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आदिवासी प्रवर्गातील कातकरी वस्तीला भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी भेट देवून योजनेच्या अंमलबजावणीसाठी कातकरी कुटुंबाच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली.

या योजनेअंतर्गत आदिवासी प्रवर्गातील सर्व लाभार्थ्यांना आधार कार्ड, जातीचे दाखले, रेशन कार्ड, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड आधी योजनेचा लाभ देण्यात येत असून १ जानेवारी २०२४ रोजी वस्तीवर सर्वांच्या आरोग्य तपासणीसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या वस्तीवरील जागाधारकांना शासकीय योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्याबाबतदेखील प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. आदिवासी बांधवांनी प्रधानमंत्री जनमन योजनेचा लाभ घ्यावा व सर्वेक्षणास सहकार्य करावे, असे आवाहन श्री.कचरे यांनी केले आहे.

See also  बेताल व्यक्तव्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाची माफी मागावी - परशुराम वाडेकर यांची मागणी