व्यक्तीवाद लोकशाहीसाठी धोक्याचा – अशोक वानखेडे ; मान्यवरांच्या हस्ते सुनील माने यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे  : व्यक्तिकेंद्रित राजकारण लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. व्यक्तीवादामुळे भविष्यात देशांत हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असे परखड मत झुंजार आणि निर्भीड पत्रकार अशोक वानखेडे यांनी मांडले. ज्येष्ठ पत्रकार तसेच कॅटलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील माने लिखित ‘प्रभावांचा प्रवास’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी लोकमत पुणेचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र टाइम्स पुणेचे निवासी संपादक श्रीधर लोणी, सकाळचे ज्येष्ठ पत्रकार दयानंद माने, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, माजी आमदार जयदेवराव गायकवाड , माजी पोलीस महासंचालक अशोक धिवरे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, जितेंद्र भुरूक, अशोक सोनावणे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

वानखेडे म्हणाले, लोकशाही भक्कम करण्यासाठी पत्रकाराने नेहमी सत्तेच्या विरोधात असले पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक यापलीकडे जाऊन विचार करण्याची भूमिका आणि क्षमता पत्रकारामध्ये असली पाहिजे. तसेच त्याचा चौफेर अभ्यास असला पाहिजे. सुनील माने यांची अशाप्रकारची पत्रकारिता मी दिल्लीमध्ये असताना जवळून अनुभवली आहे. त्यांनी लिहिलेल्या या पुस्तकातील चतु:रस्त्र लिखाणावरून त्यांच्या लेखनाची व्याप्ती दिसून येते. दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रापासून ते काश्मीरच्या निवडणुकीपर्यंत, वीरप्पनच्या खात्म्यापासून इस्राईलच्या प्रगत शेतीपर्यंत, भूपेन हजारिका यांच्या मुलाखतीपासून ते दिल्लीतील राजकीय वार्तांकनापर्यंत सगळे विषय सुनीलने लीलया हाताळले. पत्रकारिता सोडल्यानंतर राजकीय जनसंपर्काचा व्यवसाय करताना गिरीश बापट व अन्य नेत्यांच्या माध्यमातून त्यांनी पुण्याचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.

आवटे म्हणाले, सुनील माने यांनी या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील प्रभाव टाकणाऱ्या व्यक्ती आणि घटनांवर आपले सखोल व प्रामाणिक मत मांडले आहे. समतेसाठी झगडणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अब्राहम लिंकन या महापुरुषांविषयी असणारे लेख वाचनीय आहेत. बाबासाहेबांनी ‘मूकनायक’ची सुरुवात तुकारामांच्या अभंगाने केली होती. डॉ . बाबासाहेबांनी पहिला सत्याग्रह छ.शिवाजी महाराजांची भूमी असलेल्या महाडमधून केला होता. त्यामुळे जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन ते देशातील सर्व नागरिकांसाठी ते कार्यरत होते. सध्या जगाची वाटचाल कट्टरतेकडून अतिकट्टरतेकडे चालली असल्याचे सांगत त्यांनी सध्या सत्ताधार्‍यांविरोधात बोलणे सुद्धा देशविरोधी ठरते, असे चित्र आहे.  त्याकाळी मात्र डॉ. बाबासाहेबांनी विरोधकांना उद्देशून तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी दिवसरात्र अभ्यास करेन मात्र तुमचा मुद्दा मांडू देण्यासाठी जीवाची बाजी मांडेन, असे उद्गार काढल्याची आठवण त्यांनी करून दिली.

लोणी म्हणाले की, एकीकडे प्रगत तंत्रज्ञानाला आपण वरदान समजत असतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा होणारा अवास्तव वापर भविष्यात आपल्याला धोकादायक ठरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुर्दैवाने, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जोरावर सत्य असत्य, खरे- खोटे यातील वास्तविकता पुसट करून ‘खोटे बोल पण रेटून बोल’ असा प्रकार सध्या सुरू आहे. हे पाहता, एखाद्या घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर भविष्यात असेल. असे एकूणच वातावरण असताना सुनील माने यांच्यासारख्या जमिनीशी नाळ जुळलेल्या, जाणत्या व अभ्यासू व्यक्तीचा लेखसंग्रह प्रकाशित होणे ही बाब निश्चितच आशादायी आहे.

दयानंद माने म्हणाले की, अस्पृश्यता मोडून काढताना डॉ बाबासाहेबांसमोर अनेक आव्हाने होती, अगदी गावातील पाणवठा सुद्धा सवर्ण आणि अस्पृश्य समाजासाठी वेगळा होता. चवदार तळ्याला चारीही बाजूनी दारे होती म्हणूनच त्याला चवदार तळे नाव रूढ झाल्याचे त्यांनी सांगितले. ज्याचा नायक मूक आहे, किंवा जे भारतातून बहिष्कृत आहेत त्या लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत या सारख्या नियतकालिकांची त्यांनी सुरू केली. डॉ. बाबासाहेबांचे विचार हे विज्ञानवादी आणि वस्तुनिष्ठ होते. आज त्यांच्या प्रेरणा नेतृत्व प्रभावित होऊन सुनील तळागाळातून येऊन भरारी घेणाऱ्या अनेक तरुणांचे आदर्श ठरत आहेत. ही बाब प्रशंसनीय आहे.

आधुनिक जगाला पहिल्यांदा स्वातंत्र्य, समता ही मूल्ये दिली ती फ्रेंच राज्यक्रांतीने. याच फ्रेंच राज्यक्रांतीची सुरूवात ५ मे रोजी झाली. याचा उल्लेख बाबासाहेबांनी देखील चवदार तळे सत्याग्रहात केला होता. हे औचित्य साधून या पुस्तकाचे प्रकाशन करत असल्याचे सुनील माने यांनी सांगितले. जगातील २५ देशांत प्रत्यक्ष पाहून त्यांच्या समाज आणि आपली समाज व्यवस्था यांच्या तुलनात्मक मुद्द्यांचे पुस्तक यानंतर लिहित असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रस्तुत पुस्तकातील लेख वाचताना मानवाच्या भावविश्वाची स्पंदने आपल्याला स्पर्शून जातात, असे सांगत अरुण खोरे यांनी पुस्तकातील लेखांचा आढावा घेतला. तसेच त्यांच्या आई विषयीच्या लेखाचे स्वतंत्र पुस्तकरूपी स्वरूप आम्हाला वाचायला आवडेल, असा प्रेमळ सल्लाही त्यांनी माने यांना दिला.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखील गायकवाड यांनी केले. आभार दीपक म्हस्के यांनी मांडले.
                    

See also  पुणे विभागीय भरारी पथकाकडून ११ लाखाहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त