विवाहसोहळ्याचा खर्च रामनदी आणि भवताल  पुस्तकासाठी देण्याचा अनोखा संकल्प; तेजस पवार आणि प्रतिक्षा थोपटे यांच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक

भुगाव, ता. मुळशी : आजकाल विवाहसोहळा म्हटलं की भव्यदिव्य शाही कार्यक्रम, हजारोंच्या जेवणावळ्या, प्रदूषण करणारी रोषणाई आणि ट्राफिक जाम करणारी प्रचंड गर्दी हेच चित्र डोळ्यांसमोर येतं. लग्नसमारंभात लाखो रुपये पाण्यासारखे ओतले जातात. विशेष म्हणजे, सधन असो वा सामान्य कुटुंब, आजकाल सगळेच या दिखाव्याला आणि ओंगळवाण्या प्रदर्शनाला बळी पडत आहेत. पण भुगाव येथे सोमवार दिनांक 3 नोव्हेंबर, 2025 रोजी पार पडलेल्या साखरपुडा समारंभात एक वेगळाच संकल्प करण्यात आला.

भुगावचे तेजस पवार आणि राजगड येथील प्रतिक्षा थोपटे यांनी त्यांच्या साखरपुडा समारंभात असा संकल्प केला की आम्ही आमचा विवाह सोहळा कौटुंबिक स्तरावर साधेपणाने आणि रजिस्टर पद्धतीने करणार आहोत. या विवाह सोहळ्यासाठी होणारा खर्च टाळून, तीच रक्कम आम्ही रामनदी आणि भवताल या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी देणार आहोत. तेजस वकील आहे; तर प्रतिक्षाने बीएस.सी. फिजीक्स आणि एम. ए. सोशिऑलॉजीचे शिक्षण घेतले असून, ती सध्या पीएचडीची तयारी करत आहे. या उच्चशिक्षित जोडीने घेतलेल्या सामाजिक भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. सामाजिक बांधिलकी जपत अभिनव उपक्रम राबवण्याची परंपरा अनिल पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांनी पहिल्यापासूनच जोपासली आहे. 2018 साली अनिल पवार यांचे बंधू संजय पवार यांचाही विवाहसोहळा अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आला होता आणि विवाहाच्या खर्चाची 5 लाख इतकी रक्कम श्री छत्रपती शिवाजी महाराज जलाशयातील गाळ काढण्यासाठी देण्यात आली होती. संजय आणि त्यांच्या पत्नी सी.ए. आहेत. उच्चशिक्षित तरुणांनी सामाजिक बांधीलकी जोपासत केलेलं हे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तेजस यांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवत 10 लाख रुपयांची रक्कम रामनदी पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आणि वितरणासाठी दिली आहे. रामनदीचं प्रदूषण थांबावं यासाठी रामनदीची संस्कृती, तिच्याविषयीचे उपक्रम सर्वांपर्यंत पोचावेत आणि रामनदी संवर्धनाचा जागर प्रत्येक घरात व्हावा, हाच त्यांचा यामागील उद्देश आहे. लवकरच हे पुस्तक या परिसरातील प्रत्येक घरी मोफत पोहोचवण्यात येणार आहे. अनिल पवार आणि एकूणच पवार परिवार नेहमीच अशा समाजकारणात, सामाजिक उपक्रमांत सहभागी होत असतो.

See also  मनोज जरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा एक दिवस अन्नत्याग

अनिल निवृती पवार यांनी रामनदी आणि भवताल : इतिहास, संस्कृती आणि रामनदी संवर्धनाचा प्रवास या पुस्तकाचं लेखन केलं आहे. अनिल पवार हे गेली 10 वर्षे रामनदीच्या जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. रामनदी स्वच्छता अभियान, रामनदी परिक्रमा, रामनदी जलदिंडी अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून रामनदी वाचवण्यासाठी, तिचं प्रदूषण रोखण्यासाठी अनिल पवार हे सह्याद्री प्रतिष्ठान, मुळशी या संस्थेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भुगाव, भुकूम, बावधन, पाषाण, बाणेर या भागांतील नागरिकांनीही रामनदी संवर्धनाच्या उपक्रमांत आजवर मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आहे. या पुस्तकात अनिल पवार यांनी या सर्व उपक्रमांची माहिती दिली असून, रामनदीचा इतिहास, भूगोल, रामनदी खोर्‍यातील संस्कृती, रामनदी खोर्‍यातील गावांचे झपाट्याने झालेले शहरीकरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या नदीप्रदूषणाची, कोसळलेल्या गावगाड्याची स्थिती यांचे चित्र उभे केले आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण आमदार रोहित पवार यांच्या हस्ते या सोहळ्यात करण्यात आलं.

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, आम्हाला सतत अशा कार्यक्रमांची निमंत्रणं मिळत असतात. पण जे कार्यक्रम सामाजिक बांधीलकीला साजेसे उपक्रम राबवतात, तेच नेहमी लक्षात राहतात. अनिल पवार लिखित रामनदी आणि भवताल हे पुस्तक इथल्या स्थानिकांपर्यंत पोचावं आणि त्यांना रामनदीचा इतिहास व संस्कृती समजावी, हा यामागचा त्यांचा उद्देश नक्कीच स्तुत्य आहे.

या सोहळ्याला मुळशी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, विविध क्षेत्रांतील मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.