हवामान-जागरूक पिढी घडविण्यासाठी ‘पुणे क्लायमेट वॉरीयर्स’चा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात

पुणे : हवामान बदलाच्या वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी शाळांमधूनच पर्यावरण-जागरूक, जबाबदार आणि भविष्याभिमुख नागरिक घडविण्याच्या उद्देशाने ‘पुणे क्लायमेट वॉरीयर्स’च्या वतीने शिक्षक प्रशिक्षण (ओरिएंटेशन) कार्यक्रमाचे आयोजन इंडियन लॉ सोसायटी फॉर आर्बिट्रेशन अँड मेडिएशन (ILSCA), पुणे येथे करण्यात आले. पुण्यातील ५० हून अधिक शाळांमधील सुमारे १०० शिक्षकांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प प्रमुख ॲड. दिव्या चव्हाण-जाचक यांनी उपस्थितांचे स्वागत करत, “जागतिक संकल्पांना स्थानिक कृतीची साथ मिळाली तरच खरी हवामान कृती घडते,” असे सांगून ‘पुणे क्लायमेट वॉरीयर्स’ ही शाळांना हवामान-जागरूक आणि जबाबदार नागरिक घडविणारी सहयोगी चळवळ असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. वंदना चव्हाण यांनी १९७२ च्या स्टॉकहोम परिषदेतून सुरू झालेल्या जागतिक हवामान चळवळीचा आढावा घेत तळागाळातील लोकसहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ‘वॉर्ड वॉच’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी जबाबदाऱ्या आणि पर्यावरणीय प्रश्न सोडविण्यात सक्रिय सहभागाची संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) विषयी मार्गदर्शन करताना श्रीमती मालती कलमाडी यांनी अनुभवाधारित, कौशल्याधारित आणि आनंददायी शिक्षणावर भर दिला. ‘पुणे क्लायमेट वॉरीयर्स’चे शाश्वत विकास उद्दिष्टांवर (SDGs) आधारित उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सहकार्य आणि प्रत्यक्ष कृतीतून शिक्षणाला चालना देतात, असे त्यांनी नमूद केले. “ही स्पर्धा नसून सहकार्याची चळवळ आहे. पर्यावरणाबद्दल संवेदनशील आणि जबाबदार विद्यार्थी घडविणे हेच खरे यश आहे,” असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात हवामान बदलामुळे निर्माण होणारी मानसिक अस्वस्थता (Climate Anxiety), आपत्तीपूर्व तयारी, प्रथमोपचार, मानसिक आरोग्य आणि भावनिक स्थैर्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवरही मार्गदर्शन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख गणेश सोनुने यांनी आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती दिली, तर सेंटर फॉर मेंटल हेल्थ लॉ अँड पॉलिसी (CMHLP)च्या प्रतिनिधींनी मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.

द इको फॅक्टरी फाउंडेशनचे संस्थापक आनंद चोरडिया यांनी शाश्वत विकास, हरित उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण पर्यावरणपूरक उत्पादनांच्या निर्मितीसाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. तसेच ‘शाश्वत भारत सेतू’ या संवादात्मक प्रदर्शनाची माहिती देत शाळांना ‘नेट झिरो सिटीज सेंटर फॉर एक्सलन्स’ला भेट देण्याचे निमंत्रण दिले.

See also  पाषाण येथे गावचे पोलीस पाटील पंडितराव जाधव यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीर

कार्यक्रमाच्या समारोपावेळी ५० हून अधिक शाळांतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत हवामान शिक्षण प्रत्यक्ष कृतीद्वारे पोहोचविण्याचा सामूहिक संकल्प केला. अनुभवाधारित शिक्षण, जबाबदार नागरिकत्व आणि सामूहिक कृतीच्या माध्यमातून ‘पुणे क्लायमेट वॉरीयर्स’ ही हरित, निरोगी आणि शाश्वत भविष्य घडविणारी प्रभावी चळवळ म्हणून पुढे वाटचाल करत असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास वृषाली दाभोळकर, राधिका नाईकवाडी, पुणे क्लायमेट वॉरीयर्सच्या टीममधील सदस्य तसेच अनेक स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.