देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे- राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा

पुणे : अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांच्या मनातील भिती कमी करुन त्यांच्या मनात सुरक्षितेतची भावना निर्माण करण्यासाठी विघातक वृत्तीविरुद्ध एकत्र येऊन प्रतिकार केला पाहिजे. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व समाजघटकांनी मिळून काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा यांनी केले.

शासकीय विश्रामगृह येथे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मुस्लिम मंचचे जावेद शेख, वक्फ प्रॉपर्टीस बचाव ॲक्टीव्हीस्ट मुश्ताक अहमद, ब्रिटीश असोशिएसन फॉर सिमेट्रीज इन साऊथ इंडियाचे पीटर डिक्रुझ आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

श्री. लालपुरा म्हणाले, देशाच्या अमृत महोत्सवी काळात केंद्र सरकार विविध लोककल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करीत आहे. आपणही देशासाठी योगदान द्यावे. देशात १५ कलमी कार्यक्रमाचे आखणी करण्यात आली आहे. सर्वांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, हक्काचे घर, शुद्ध पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकार काम करीत आहे.

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग आपल्या न्याय व हक्कासाठी कार्यरत आहे. आपल्या समस्या सरकार दरबारी सोडविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. अल्पसंख्याक समुदायातील नागरिकांना अल्पसंख्याक प्रमाणपत्र देण्याबाबत आयोगाने राज्य शासनाला निर्देश देण्यात आले आहेत. अल्पसंख्यांक समाजासाठी विश्वकर्मा श्रम सन्मान योजना, स्टार्टअप इंडिया, मदरसा आधुनिकरण योजना, पढो परदेश, या सारख्या विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे, असेही श्री. लालपुराजी म्हणाले.

श्री. लालपुरा यांना अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधीनी मागण्याबाबत निवेदन दिले. यावेळी प्रतिनिधींनी आपले विचार व्यक्त केले.

See also  बाणेर येथील सौ पूनम विशाल विधाते यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड