जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची पालखीमार्ग व पालखीतळांना भेट

वारकऱ्यांना असुविधेला तोंड द्यावे लागू नये याची दक्षता घेण्याचे निर्देश

पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हवेली तसेच पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-सासवड-जेजुरी-नीरा या पालखीमार्गाला व पालखी तळ, विसाव्यांच्या ठिकाणांना भेटी देऊन तेथील तयारीच्या अनुषंगाने आढावा घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हवेलीचे प्रांताधिकारी संजय आसवले, दौण्ड- पुरंदर उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, श्री संत ज्ञानदेव महाराज देवस्थान आळंदीचे पदाधिकारी, हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे, राष्ट्रीय महामार्गचे कार्यकारी अभियंता अभिजित औटी आदी उपस्थित होते.

वारकऱ्यांना कोणत्याही असुविधांना तोंड द्यावे लागू नये याची दक्षता प्रशासनाने घ्यावी. पालखीमार्गावर आरोग्य सुविधा, पुरेसा औषध साठा, फिरत्या शौचालयांची व्यवस्था, पाणी, वीज आदी सर्व सुविधा प्राधान्याने पुरवण्यात याव्यात. दरवर्षीपेक्षा एक महिना अगोदर पालखीचे प्रस्थान होणार असल्याने उन्हाचा त्रास वारकरी भाविकांना होऊ नये यासाठी आवश्यक त्या औषधांची व्यवस्था ठेवावी, पुरेसे पिण्याचे पाण्याचा पुरवठा करण्यास प्राधान्य द्या, असे निर्देश डॉ. देशमुख यांनी यावेळी दिले.

पालखीमार्गाच्या साईडपट्टया भरुन घेण्यासह खड्डे तसेच पाणी साचणाऱ्या ठिकाणी मुरूम व अन्य पर्यायांचा वापर करुन डागडुजी करावी. पालखी विसावा, मुक्काम असलेल्या गावातील पिण्याच्या पाणी योजनांसाठी अतिरिक्त राखीव पंप ठेवावेत. टँकर वाढवावेत. ऐनवेळी तांत्रिक अडचणी येऊ नयेत म्हणून पर्यायी व्यवस्था तयार ठेवावी. मार्गात आवश्यक तेथे पाण्याच्या टाक्या ठेवाव्यात.

दिवे घाटाचा टप्पा पार केल्यानंतर झेंडेवाडी विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांना मोठा विसावा घ्यावा लागतो. त्या ठिकाणी वारकऱ्यांना विसावा घेता यावा यासाठी पुरेशी जागा उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासनाने शेजारील खासगी जमीनधारकांशी संपर्क साधून व्यवस्था करावी.

सासवड पालखीतळाची उंची वाढवण्याचे काम झाल्यामुळे पावसाचे पाणी साठण्याच्या अडचणीवर मात करणे शक्य झाले आहे. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत राहील याकडे लक्ष द्या. पर्यायी व्यवस्था म्हणून जनरेटर ठेवावेत, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. कऱ्हा नदीवरील पुलाच्या कामालाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाला गती देण्याचा सूचना दिल्या. कोणत्याही परिस्थिती पुलाचे काम पूर्ण करून पालखी पुलावरून जाईल असे नियोजन सुरू असल्याचेही डॉ. देशमुख म्हणाले.

See also  मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार -मुरलीधर मोहोळ

जेजुरी पालखीतळाच्या सीमाभिंतीच्या कामाची पाहणी करून हे काम वेळेत पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या. डॉ.देशमुख यांनी सासवड जवळील बोरावके मळा विसावा, वाल्हे पालखीतळ, नीरा पालखी विसावा स्थळ पाहणीदेखील केली . नीरा नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्यांची दुरुस्ती तत्काळ करून घ्या असेही त्यांनी सांगितले.

हवेली तालुक्यात ऊरुळी देवाची पोलीस ठाण्याजवळील विसाव्याच्या ठिकाणाची डागडुजी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. वडकी विसावा येथे स्थायी स्वरुपात उभारण्यात आलेल्या सिमेंट काँक्रेट स्टेजचीही त्यांनी पाहणी केली. स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधत तेथील अडचणी जाणून घेतल्या.

घाटामध्ये कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

दिवे घाटामध्ये कचरा टाकण्यात येत असल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने घाटामध्ये गस्त घालण्यात यावी. असे प्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही डॉ. देशमुख यांनी दिले.

यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे मनपा क्षेत्रीय अधिकारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, संबंधित गावचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.