पुणे : ओंकारेश्वर घाटावरील चोरीच्या घटनांवर चाप बसवण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित करण्यात आले असून, त्याचे लोकार्पण आज करण्यात आले.
हिंदू चालीरीतींनुसार एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर दहाव्या दिवशी करण्यात येणारा विधी म्हणजे दशक्रिया! पुणे शहरात हा विधी मुठा नदीच्या काठावर आणि ओंकारेश्वर मंदिराच्या जवळच असणाऱ्या घाटावर होतो. शहरातील अनेक नागरिक निधन झालेल्या आपल्या आप्तांना मुक्ती मिळावी, यासाठी प्रार्थना करतात.
पण या घाटाला चोरीच्या घटना घडत असल्याचे इथल्या पुजारी मंडळींकडून निदर्शनास आले. घाटावरील दशक्रिया विधीचे साहित्य चोरट्यांनी कपाट फोडून लंपास केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे सुरक्षेची व्यवस्था करून तातडीने सीसीटीव्ही बसवावेत जेणेकरून अश्या प्रकारांना आळा बसेल, अशी मागणी इथल्या पुजारींकडून सातत्याने करण्यात येत आहे.
त्यामुळे या घटनांवर चाप बसविण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी लोकसहभागातून सीसीटीव्ही कार्यान्वित केले असून, आज त्याचे लोकार्पण केले. यावेळी येथील पुजाऱ्यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्यक्षमतेवर समाधान व्यक्त करुन, कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी झोन १ चे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल्ल,माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीपजी खर्डेकर, कुणाल टिळक भाजपा कसबा मंडल अध्यक्ष प्रमोद कोंढरे, राजेश येनपुरे, राजेंद्र काकडे, राणी कांबळे, संजय देशमुख, धनंजय जाधव, अमित कंक,यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.























