औंध: आज दि.२४ जुलै, २०२३ रोजी महाराष्ट्र विधिमंडळात औंध (जि. पुणे) येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा झालेला मृत्यू प्रकरणी आमदार भिमराव तापकीर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला.
ज्यामध्ये आमदार तापकीर यांनी पिंपळे गुरव (जि.पुणे) येथील श्रीमती दिप्ती विरनळ या गर्भवती महिलेच्या अचानक पोटात दूखू लागल्याने तीला दिनांक २३ फेब्रुवारी,२०२३ रोजी वा त्या सुमारास औंध (जि.पुणे) येथील जिल्हा रुग्णालयात आणले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा मृत्यू झाला असल्याचे सांगत संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याने गर्भवती महिलेची तपासणी करतेवेळी केलेल्या दुर्लक्षामुळे सदर महिलेची प्रकृती गंभीर झाली असल्याने तीला ससून रुग्णालयात पाठविले असता रस्त्यातच प्रसूती झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले असल्याने हे खरे आहे काय, असल्यास, या प्रकरणाची शासनाने चौकशी करुन संबंधितांवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे, अशी विचारणा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री यांना केली यावर लेखी उत्तर देतांना मंत्री मा. तानाजी सावंत यांनी सांगितले कि हे अंशत: खरे असून सदर महिला २६ आठवडयाची गरोदर (कमी दिवसाची ) असल्याने प्रसुती पश्चात तात्काळ बाळाला व्हेन्टीलेटर आवश्यक असल्याने सदर रुग्णास ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे १०८ सुविधेसह संदर्भित करण्यात आले होते. तथापि सदर रुग्ण हा ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे न जाता पुणे महानगरपालिकेच्या औंध कुटीर व प्रसुती रुग्णालयात गेला. तेथील रुग्णवाहिकेमधून तात्काळ ससून सर्वौपचार रुग्णालय, पुणे येथे पोहचल्यावर तिचा गर्भपात होवून मृत बाळ जन्मले. यामध्ये सदर प्रकरणात चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालानुसार संबंधित कंत्राटी वैद्यकीय अधिकारी यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिपरिचारीका यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे असे सांगितले.