राज्यात जपानच्या धर्तीवर ‘ऑलिम्पिक भवन’ उभारणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. २९ : खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन उभारणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिली.

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्त  जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी (मुंबई शहर) यांच्यावतीने जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन धारावीतील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे करण्यात आले होते. खेळाडू आणि प्रशिक्षकांना जिल्हा क्रीडा पुरस्कार प्रदान करून त्यांच्या सन्मानार्थ आयोजित कार्यक्रमात मंत्री श्री. बनसोडे बोलत होते.  रोख 10 हजार रुपये सन्मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

मंत्री श्री. बनसोडे यांनी जीवन गौरव पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, अर्जुन पुरस्कार प्राप्त हिमानी परब, शिव छत्रपती पुरस्कार विजेते रणजित तांबे यांचाही सन्मान केला.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की,  राज्यातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर उत्तम कामगिरी करावी यासाठी विविध क्रीडा संघटनांशी चर्चा करून क्रीडा धोरणात बदल करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थापन करण्यात आले असून क्रीडा तज्ज्ञाची कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. क्रीडा विज्ञान (स्पोर्टस् सायन्स) सारखे नवीन विषय सुरू करून, लक्षवेध योजना अमलात आणणार आहे. महिला खेळाडूही मोठ्या संख्येने यश प्राप्त करीत असून, आंतरराष्ट्रीयस्तरावरही ते यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन ‘राज्य क्रीडा दिन’ म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सन 2022-23 करिताचे जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष (जिमनॅस्टिक) चैतन्य देशमुख, गुणवंत खेळाडू महिला (पावरलिफ्टिंग) समृद्धी देवळेकर, थेट पुरस्कार (तायक्वांदो) श्रेया जाधव, तर गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (बास्केटबॉल) सय्यद रहिमतुल्ला यांना प्रदान करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

सन 2021-22 साठीचे जिल्हा क्रीडा पुरस्कार गुणवंत खेळाडू पुरुष (पॉवर लिफ्टिंग) अजिंक्य पडवणकर, गुणवंत खेळाडू महिला (जिमॅस्टिक- रिदमिक)  परिना मदनपोत्रा, थेट पुरस्कार साहील उत्तेकर (पॉवर लिफ्टिंग), (जिमॅस्टिक) अंजलिका फर्नांडिस, सृष्टी पटेल, मिहिका बांदिवडेकर, अनन्या सोमण, सानिया कुंभार, वैभवी बापट, सौम्या परुळेकर, निश्का काळे, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक (बास्केटबॉल)मो. नसीर अहमद अन्सारी  यांना  तसेच मेजर ध्यानचंद क्रीडा स्पर्धेच्या विजेत्यांनाही पुरस्कार प्रदान करून त्यांचा  सन्मान करण्यात आला.

See also  राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण

जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, उपजिल्हाधिकारी राजेंद्र काटकर, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त वर्षा उपाध्याय यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन व जिमॅस्टिक, रस्सीखेच या खेळांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले होते.