अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानच्या प्रतीकात्मक पुतळ्याला आम आदमी पक्षातर्फे जोडे मारो आंदोलन

पुणे : जम्मू कश्मीरच्या अनंतनाग मध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण आले. या घटनेमुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तान सरकारचा तसेच या कटात सहभागी असणाऱ्या दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करून आम आदमी पक्षातर्फे मराठा वॉर मेमोरियल ईस्ट स्ट्रीट कॅम्प या ठिकाणी जाहीर निषेध केला गेला.

यावेळी दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवण्यासाठी भारतीय सरकारने लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच गेल्या 75 वर्षात भारताने प्रगती केली तर दुसरीकडे पाकिस्तानने कश्मीरच्या नावाखाली केवळ भारतात दहशतवाद पसरवण्याचा प्रकार केला आहे या गोष्टींवर आता कठोर कारवाई करण्याची वेळ आली आहे, आजपर्यंत आपल्या अनेक जवानांनी वेळोवेळी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये वीरमरण पत्करले आहे आणि त्याचा सूड घेण्याची हिंमत भाजपा सरकारने दाखवावी अशी मागणी आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी केली.

याप्रसंगी आम आदमी तर्फे शहराच्या सर्व भागातून कार्यकर्ते सहभागी झाले होते आणि सर्वांनी पाकिस्तान तसेच पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद याचा मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला.




See also  अजितदादा पवार हे 65 वर्षाचे सीनियर सिटीजन आहेत - खासदार सुप्रिया सुळे