गुणवत्ता आणि संधी नाकारणारा कंत्राटी भरती आदेश मागे घ्या : आप

पुणे : बाह्ययंत्रणे कडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थांचे पॅनल नियुक्त करण्याचा शासन निर्णय 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार विविध पदांवरती शासकीय विभाग, निमशासकीय विभाग ,स्थानिक स्वराज्य संस्था ,महामंडळे, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इत्यादींना कंत्राटांवर भरती करणे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्य सरकारचा हा बाह्य एजन्सीमार्फत कंत्राटी नोकरभरतीचा आदेश मागे घ्यावा या मागणीसाठी आम आदमी पार्टी तर्फे शास्त्री रोड,नवी पेठ भागात जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यास भरती परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सहभागी होत मोठा प्रतिसाद दिला.

महाराष्ट्रात विविध शासकीय विभाग व जिल्हा परिषद अंतर्गत २.४४ लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. या भरती साठी गेली काही वर्षे एमपीएससी व इतर भरती स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आहेत. सरळ सेवा भरतीची हे लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. असे असताना या नवीन कंत्राटी धोरणामुळे भरतीची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तोंडाला पाने पुसली जाणार आहेत. अंदाजे ७५००० सरकारी जागा या एजन्सी/ कंत्रादारांकडून भरल्या जातील असा अंदाज आहे.

या आदेशानुसार भरती केलेल्या पदासाठी निर्धारित पगाराच्या केवळ ६० टक्के रक्कम ही प्रत्यक्ष कर्मचाऱ्याला हातात दिली जाणार आहे आणि दरमहा १५ टक्के रक्कम ही नियुक्त करणाऱ्या कंत्राटदाराला मिळणार आहे. हे कंत्राटदार आणि मंत्र्यांसाठी भ्रष्टाचाराचे आणि वशिल्याच्या भरती चे कुरण ठरणार आहे. स्पर्धा नसल्याने गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होणार आहे तर वंचित घटकातील मुलांना संधीच मिळणार नाही. तसेच या पद्धतीमुळे संबंधित व्यक्तीचे जनतेप्रती उत्तरदायित्व व जबाबदारी राहणार नाही, जनतेस सेवाहमी मिळणार नाही. असे आक्षेप आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी व्यक्त केले व दिल्ली पंजाब आदी ठिकाणी जुनी पेन्शन योजना लागू केली जात आहे. तसेच कंत्राटावर असणाऱ्या शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायम करण्याचे धोरण आम आदमी पार्टीची सरकारे राबवत आहेत असे असताना महाराष्ट्रात मात्र याच्याबरोबर उलटे धोरण भाजप शिवसेना राष्ट्रवादी यांचे शिंदे फडणवीस पवार सरकार राबवत आहे असे सांगितले.

See also  पुण्याची मुंबई होऊ नये यासाठी हडपसर येथे जनजागृती अभियान


आंदोलनात मुकुंद किर्दत , अनिल कोंढाळकर, सतिश यादव, निलेश वांजळे, अक्षय शिंदे, ॲड अमोल काळे, किरण कद्रे, अमोल मोरे, ज्ञानेश्वर गायकवाड, प्रशांत कांबळे, धनंजय बेनकर, शाशिभूषण होले, अभिजीत गायकवाड,साजिद कुरेशी, इरफान रोड्डे, मनोज थोरात, सय्यद अली, संजय रणधीर, शंकर थोरात,तानाजी शेरखाने, किरण कांबळे, अविनाश भाकरे, असगर बेग, जिबरील शेख, असिफ मोमीन, उमेश बागडे, शेखर ढगे, माधुरी गायकवाड, फाबियन समसन, अजय पैठणकर, प्रभाकर कोंढाळकर, शिवाजी डोलारे, उत्तम वडावराव , सुनील भोसले, किर्तीसिंग चौधरी, बाबा शिरसाट, बापू रणसिंग, सखाराम भोकर,निखिल खंदारे उपस्थित होते.