अण्णाभाऊ साठे सभागृहात वारली चित्रकला शिबीर

पुणे : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती सभागृह बिबवेवाडी येथे शुक्रवार २२ सप्टेंबरपासून तीन दिवसीय प्रादेशिक संस्कृती महोत्सवाला सुरुवात होणार आहे. भारत सरकार संस्कृती मंत्रालय, पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दक्षिण मध्य विभागीय सांस्कृतिक केंद्र नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, प्रचार आणि लोकप्रियता हे तीन दिवसीय महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. अण्णा भाऊ साठे सभागृहात गुरुवारी वारली चित्रकला शिबिराला सुरुवात झाली. शिबिराचे उद्घाटन पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता आणि दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे संचालक प्राध्यापक सुरेश शर्मा यांच्या हस्ते झाले.

शिबिरात महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील २३ वारली कलाकार वारली चित्रे साकारणार आहेत. या पेंटिंगमध्ये वारली समाजाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व घटनांचे चित्रण करण्यात आले आहे. ज्यात लग्न, दिवाळी, होळी, नृत्य, झाडे-वनस्पती, सृष्टीची उत्पत्ती, महादेव-गौरी यांची कथा चित्रांतून दाखवली आहे. लाल माती, शेण आणि तांदळाच्या पिठापासून वारली पेंटिंग बनवली जाते.

पश्चिम विभागीय सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता म्हणाल्या, महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पुण्यातील ५० स्थानिक स्पर्धकांना गोंड, वारली आणि माण्डणा कलेच्या नामवंत कलाकारांकडून पारंपरिक कला कार्यशाळेत प्रशिक्षण दिले जाईल. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उद्घाटन सोहळा होणार आहे. संध्याकाळी देशातील प्रसिद्ध कलाकार पार्वती दत्ता यांचा समूह ओडिसी नृत्य सादर करेल. सायंकाळी देशातील विविध राज्यातील लोककलाकारांचे उत्कृष्ट लोकनृत्य सादरीकरण होणार आहे.

महोत्सव कालावधीत सकाळी ११ ते रात्री ८.३० हस्तकला, हस्तशिल्प आणि पारंपरिक खाद्य महोत्वाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार २३ सप्टेंबर रोजी दुपारी ५.३० ते रात्री ९ वाजेपर्यंत लोकनृत्यांचे कार्यक्रम, वडोदरा येथील एमएस विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्याद्वारे कथक नृत्याचे सादरीकरण, मधुरा दातार यांची संगीत मैफल आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार २४ सप्टेंबर रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होणार आहे. या दिवशी स्वरसंगम संस्कृती मंच नागपूरच्या कलाकारांचे भरतनाट्यम् सादरीकरण, लोकनृत्य सादरीकरण तसेच साधना सरगम यांच्याद्वारे सांगितीक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. नागरिकांनी या महोत्सवाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

See also  पुण्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान ‘शिवगर्जना’ महानाट्य; महिनाअखेरीस ‘महासंस्कृती महोत्सव’