खादी ग्रामोद्योगमार्फत ‘आपली दिवाळी, स्वदेशी दिवाळी’ प्रदर्शनाचे आयोजन

पुणे : राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सहकार्याने वंचित विकास संस्थेच्या माध्यमातून ‘आपली दिवाळी स्वदेशी दिवाळी’ या विशेष प्रदर्शनाचे १ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत शुभारंभ लॉन्स, डी.पी. रोड, म्हात्रे ब्रिज, कर्वेनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्योगरत्न पुरस्कारार्थी बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल आदी उपस्थित राहणार आहेत.

१ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम, २ नोव्हेंबर रोजी भरड धान्य पाककृती, ३ नोव्हेंबर रोजी वेशभूषा स्पर्धा, ४ नोव्हेंबर रोजी स्वरसंध्या आयोजित हिंदी व मराठी सुमधूर गीतांचा कार्यक्रम तर ५ नोव्हेंबर रोजी सामर्थ्य महिला मंच प्रस्तुत पारंपारिक खेळाचे आयोजन करण्यात येणार आहेत.

या प्रदर्शनात बचत गटातील महिलांची विविध उत्पादने, खाद्यपदार्थ, खादी कपडे, सिल्क साड्या, हँडमेड ज्वेलरी, कलमकारी कपडे, कलाकुसरीच्या वस्तू, हातकागदापासून बनवलेल्या वस्तू, भरड धान्य, सुका मेवा, हर्बल उत्पादने, दिवाळी फराळ, सौंदर्य प्रसाधने, राज्य खादी मंडळाच्या शुद्ध सेंद्रिय मध आदी वस्तूंचे स्टॉल असतील. तसेच पुण्यातील २० पेक्षा जास्त गणेशोत्सव मंडळे व सामाजिक संस्था सहभागी होणार आहेत.

महिला सबलीकरणाच्या कार्याला पाठबळ देण्यासाठी या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग नोंदवून लाभ घ्यावा, असेही आवाहन खादी व ग्रामोद्योग मंडळाने केले आहे.

See also  राज्यातील सौर ऊर्जा प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस