सिमेंटच्या जंगलात हिरवळ फुलविणारे वसुंधरा संवर्धन अभियान : पुणे बुलेटीन दिवाळी विशेष

पर्यावरण पूरक दिवाळी : सिमेंटच्या जंगलात हिरवळ फुलविणारे वसुंधरा संवर्धन अभियान उत्तर किंवा दक्षिण ध्रुवीय प्रदेशात हिमनग नष्ट होण्याची प्रक्रिया किंवा हिमालयातील ढगफुटी, भूरख्खलनामुळे होणारी हानी या बातम्या आपल्याला निसर्गात होणाऱ्या बदलाबद्दल जाणीव करून देत असतात. यासारख्या हवामान दुष्परिणामाच्या बातम्या आपण आजकाल प्रत्येक ठिकाणी ऐकत असतो, वाचत असतो. या घटना खर तर मानवनिर्मितच आहेत. कारण यासर्व घडामोडीच्या मागे वृक्षतोडीमुळे संपलेली जैवविविधता आणि वातावरणात वाढलेले तापमान हे प्रमुख घटक आहे. या दशकात झालेली महाराष्ट्रातील माळीन गावाची घटना असो किंवा केदारनाथ मधील जलप्रलय हे एक हवामान बदलाचे विदारक चित्र म्हणावे लागेल. तरीही आपण निसर्गाने दिलेला हा इशारा न समजता विनाशाच्या दिशेने अधिक जोमाने प्रवास सुरु केला आहे. परंतु काही समाजघटक आहेत ज्यांनी अशा मानवनिर्मित चुका सुधारण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. पुण्यातील वसुंधरा अभियान बाणेरची टीम त्यापैकीच एक, काय आहे हे अभियान याचा संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पर्यावरण प्रेमीना माहिती व्हावी म्हणून घेतलेला हा मागोवा..


भीमा नदीच्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर पुणे शहर वसले आहे. सह्याद्री डोंगररांगाच्या पूर्वेस असलेल्या या शहरास ज्याप्रमाणे प्राचीन वैभवशाली इतिहास आहे. त्याचप्रमाणे जैवविविधतातेचा सुद्धा मोठा वारसा आहे. परंतु दिवसेंदिवस होणाऱ्या नागरीकरणामुळे शहराच्या सभोवताल असणाऱ्या टेकड्यांना मानवी वस्तीचा गराडा पडला आणि मानवाने क्षणिक आणि दिखाऊ सुखासाठी सरळ-सरळ नैसर्गिक टेकड्यांना ओरबाडायला सुरुवात केली. त्यामुळे आधीच प्रदूषित असलेल्या पुण्याच्या हवेत या टेकड्यांच्या नष्ट होण्याने व त्यावरील जैवविविधता संपल्याने अधिकच भर पडली. परंतु त्यातही काही ठिकाणी अश्या टेकड्या आज पुण्यात आहेत ज्या शहराला ऑक्सिजन पुरविण्याचे काम निरंतर करत असून पुण्यातील प्रदूषणाच्या भास्मासुरला आव्हान देत मोठ्या दिमाखात पुन्हा नवीन भरारी घेत आहे. बंगलोर पुणे महामार्गावर असलेली पाषाण टेकडी, बाणेरमधील तुकाई टेकडी यांना नवसंजीवनी देण्याचे काम केले आहे पाषाण व बाणेर स्थित वसुंधरा अभियानाच्या सक्रिय सदस्यांनी.
*श्रीगणेशा*
जैवविविधता संवर्धन या उदेशाने केवळ 3-4 सदस्य सुरवातीला एकत्र येत पुण्यातील वसुंधरा अभियान उभे राहीले, आणि आता एकूण 2000 पेक्षा जास्त सभासद नोंदणी झाली आहे. या अभियानात सदस्य होण्यासाठी कोणतीही सभासद फी नाही. अनेक वर्षापासून ऊघडी बोडकी असलेली 248 एकर ची तुकाई टेकडी जैवविविधता संवर्धन करण्यासाठी निवडण्यात आली. कोणतीही सरकारी मदत न घेता सुरु केलेल्या या यज्ञामध्ये बँक, आयटी तंत्र, खाजगी कंपनीतील कामगार, डॉक्टर, वकील , शिक्षक तसेच बरीच मान्यवर मंडळीनी निसर्गसंवर्धनासाठी एकत्र येत आपले योगदान देत आहेत. 248 एकर परिसर असलेल्या तुकाई टेकडीवर २००६ पर्यंत ओबाडधोबाड दगड, काटेरी झाडे याशिवाय काही नव्हते… जणू यातील चैतन्यच निसर्गाने हिरावून घेतले होते. परंतु काही समविचारी मित्रांनी एकत्र येत या टेकडीचा कायापालट करण्याच्या उद्देशाने एकत्र येत *वसुंधरा अभियान बाणेर* या अभियानाची सुरुवात केली. महाराष्ट्र शासन पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाचे ३३% राष्ट्रीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३३ कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवित आहे. या मोहिमेला मिशन मोडवर राबविण्यासाठी सरकारचे सर्व विभाग कामाला लागले आहेत. परंतु अशाच एका मिशनमोडवर कोणतीही सरकारी मदत नसताना पूर्णपणे सामाजिक दाईत्व या भावनेने या अभियानाचे सदस्य कामाला लागले आहे. 2006 पूर्वी एक ओसाड असलेल्या टेकडीवर उत्तम जैवविविधता फूलवण्याचे काम *वसूंधरा अभियान बाणेर* ही संस्था करीत असून , ह्या संस्थेमध्ये कोणतीही एक-दोन व्यक्ती महत्त्वाची नसून सर्व कार्य करणारे कार्यकर्ते समान पातळीवर काम करत असतात. सन 2006 पासून *वसूंधरा अभियान बाणेर* संस्थेतर्फे तूकाई टेकडीवर पर्यावरण संवर्धन कार्य चालू असून संस्थेमार्फत आतापर्यंत 40,000 हजारपेक्षा अधिक देशी प्रजाती असलेल्या झाडांची लागवड केली आहे. (देशी शब्द यासाठी वापरला आहे कारण आपल्याला जैवविविधता जर जोपासायची असेल तर स्थानिक असलेल्या वृक्षाचीच लागवड गरजेची आहे कारण शोभेची परदेशी झाडे लावून फक्त निसर्ग दिखाऊ होतो टिकाऊ नाही) आतापर्यंत संस्थेने 680 पेक्षा अधिक प्रजातींचे संवर्धन केले आहे.पुण्यातील व महाराष्ट्रातील अनेक वृक्ष प्रेमी , वृक्ष प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी तूकाई टेकडीवर येतात. संस्थेच्या हरित कार्यात 3 वर्ष वयाच्या बालकापासून ते 80 वयोगटातील महिला – पूरूष सर्वांचे योगदान असते.

See also  पर्यावरणाचे रक्षण -पर्यावरण मित्र  रामदास मारणे यांचा लेख


*वृक्ष संवर्धन*
वृक्ष लागवड झाल्यानंतर त्यांच्या संवर्धनाचा उत्तम नमुना येथे पाहायला मिळतो. अभियानात सक्रीय असलेले सदस्य गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने दररोज 6-9 या वेळेत हरितकार्यात योगदान देत असतात. याबरोबरच दररोज सकाळी व्यायामासाठी येणारे नागरिक सुद्धा स्वयंस्फूर्तीने झाडांना पाणी घालणे, झाडांना आधार देणे व इतर कामे करीत असतात. त्याव्यतिरिक्त शनिवारी ,रविवारी मोठ्या संख्येने सभासद हजर राहून मदत करतात. झाडांना लागणारे खत,माती वाहतूक करण्यासाठी रोप वे प्रमाणे प्रणाली तयार करण्यात आली आहे. टेकडीवर रोपे पोहोचविणे किंवा इतर बांधकाम साहित्य नेणे यासाठी मानवी साखळी करून काम केले जाते. येथे सामाजिक दाईत्वाच्या जाणीवेतून सुरु असलेल्या कार्यावरून खालील संस्कृत श्लोक सहज आठवतो.
*परोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः* ।
*परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम्* ॥
परोपकारासाठी वृक्ष फळ देतात, नदीसुद्धा परोपकारासाठी वाहत राहते आणि गाय दूध आपल्याला दुध देवून परोपकारच करते, (अर्थात्) हे शरीर सुद्धा ईश्वराने परोपकारासाठीच दिले आहे.
निसर्ग संवर्धनाच्या ध्येयाने पछाडलेल्या वसुंधरा टीमला प्रत्येक सकाळ ची वेळ म्हणजे सणच . सुट्टीच्या दिवशी जेथे कित्येक लोक टीव्हीचा रिमोट घेऊन लोळत असतांना, टेकडीवर मात्र शाळेतील लहान मुल नैसर्गिक सुटीचा खरा आनंद वृक्ष संवर्धनाच्या या कामातून घेत असतात.
एका ओसाड टेकडीचे ते जैवविविधता यूक्त जंगल
कोणतेही वृक्षारोपण हे मुख्यता फोटोसेशन झाल्यानंतर दुर्लक्षित केले जाते. त्यामुळे आकडे फुगविन्यासाठी केलेले वृक्षारोपणाचे काम हळूहळू पाण्याअभावी कोमजणाऱ्या रोपट्याप्रमाणे नष्ट होते. किंतु हीच बाब लक्षात घेत वसुंधरा टीमने बाराही महिने याच अभियानाला वाहून घेतले. पाण्यामुळे झाडे मरू नये यासाठी तब्बल 31 पाण्याच्या टाक्या या परिसरात निर्माण केल्या आणि खऱ्या अर्थाने अभियानाला मूर्तरूप आले. संस्थेने झाडांना पाणी घालणेसाठी स्वकष्टातून 31 पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत. सर्व टाक्यांना नद्यांची नावे दिली आहेत. *ईंद्रायणी, चंद्रभागा, कोयना, निरा , यमूना, कृष्णा ,वेण्णा,पंचगंगा, वाघझरा , महेष , पवना , मूळा , मूठा , सिंधू , गंगा , भिमा , भामा , देव , गोदावरी, तापी ,निरा ,चेतक , लक्ष्मी, सरस्वती, गूंजवणी,तापी, सावित्री, नर्मदा,पंचगंगा.

संपूर्ण तूकाई टेकडी ही 248 एकर परिसर असून आतापर्यंत टेकडीवर 90% भागात वृक्षारोपण झाले आहे. वृक्षारोपण केलेल्या भागात काम करणे सोपे जावे म्हणून वेगवेगळ्या भागांना जंगलांची व किल्ल्यांची नावे दिली आहेत. जैवविविधता वाढविण्यासाठी , लोकांना हरित कार्यात जोडण्यासाठी संस्थेने टेकडीवर वेगवेगळे 30+ हरित प्रकल्प केले आहे *नक्षत्र उद्यान, नक्षत्र वन , सागवन, ऊंबरवन , मसाला ऊद्यान , देवराई, गणेशवन , पिंपळवन , बेलवन , पूष्प ऊद्यान, वसूंधरा मियावाकी घनवन ,आयूष काढा रोप वाटिका, लिंबाच्या 22 प्रकारच्या जातींचे लिंबू वन, देवराई, स्मृतीवन , नवग्रह वाटिका, पंचवटी , सप्तर्षी वाटिका, बोधीवृक्ष , आमराई, फुलपाखरू उद्यान , आपलं कोकण -तयार केले आहे*. या सर्व प्रकल्पांमूळे जैवविविधतेत भर पडली आहे. वेगवेगळ्या भागांना किल्ले व जंगलांची नावे दिली आहे
त्यामुळे सर्व लोकांना कामाचे स्वरूप , नियोजन व ठिकाण कळवता येते. प्रत्येक भागाची गुणात्मक वाढ लक्षात येते. संस्थेचे सदस्य गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने दररोज सकाळी 6-9 या वेळेत हरितकार्यात योगदान देत असतात. संस्थेच्या हरित कार्यास मा.डॉ.प्रकाश आमटे, अभिनेते व सह्याद्री देवराई चे प्रणेते सयाजी शिंदे,
विवेक वेलणकर, वंदना चव्हाण, हनुमंत गायकवाड व ईतर पर्यावरणतज्ज्ञांनी सदिच्छा भेट दिली आहे. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यासाठी 100 पेक्षा अधिक लहान मोठे बंधारे बांधले आहेत. संस्थेचे सदस्य दररोज दोन तास हरित कार्यात सहभागी होत असतात. अभियानात मोठ्या प्रमाणात जेष्ठ मंडळी आहेत त्यांचा अध्यात्मिक दृष्टीकोन लक्षात घेत अध्यात्मीक दृष्टिकोनातून महत्वपूर्ण असे नक्षत्र ऊद्यान तयार केले आहे. वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्य करीत असतांना संस्था अनेक पर्यावरण पूरक उपक्रमाचे आयोजन करत असते.
गड किल्ले स्वच्छता मोहीम, जलसंधारण आणि समाजकार्य
पाणी फाऊंडेशनच्या जलसंधारण कार्य सहभाग, रामनदी स्वच्छता मोहीम,गड किल्ले स्वच्छता मोहीम, अनाथ विद्यार्थीना कपडेवाटप, रक्तदान शिबिराबरोबरच विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी म्हणून दरवर्षी टेकडीवर पर्यावरण पूरक चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले जाते. काहीही शूल्क न घेता संस्था जनजागृती करिता हा उपक्रम घेत असते. परिसरातील 14-15 शाळेतील 1000 -1100 विद्यार्थी दरवर्षी सहभागी होत असतात. संस्थेचे सदस्य गेल्या 17 वर्षांपासून सातत्याने दररोज 6-9 या वेळेत हरितकार्यात योगदान देत असतात.
संस्थेच्या या हरित कार्याची दखल घेऊन पूणे मनपा, स्थानिक लोकप्रतिनिधी,स्थानिक आमदार, खासदार, मा.पालकमंत्री,मा. राज्यपाल व ईतर स्थानिक पतसंस्थानी या अभियानाचा सन्मान केला आहे.
महाराष्ट्र शासनाने वनमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते,नुकताच वृक्षारोपणा मधला सर्वोच्च असा श्री शिवछत्रपती वनश्री पुरस्काराने संस्थेला सन्मानित केले आहे.
परिसरातील अनेक सामाजिक घटक , संगोपन गट , आयटी कंपनीचे कर्मचारी संस्थेच्या हरित कार्यात सहभागी होत असतात. 2006 पूर्वी एक ओसाड असलेल्या टेकडीवर ऊत्तम जैवविविधता फूलवण्याचे काम वसूंधरा अभियान बाणेर ही संस्था करीत असून , ह्या संस्थे मध्ये कोणतीही एक -दोन व्यक्ती महत्त्वाची नसून सर्व कार्य करणारे कार्यकर्ते समान पातळीवर काम करत असतात. आपण सुध्दा संस्थेच्या हरित कार्यात सहभागी होऊन पर्यावरण संवर्धन करू शकता. सकाळी 6-9 या वेळेत आपण संस्थेच्या सदस्यां बरोबर सहभागी होऊ शकता.
वसूंधरा अभियान बाणेर- ९८८२ ५०१ ५०१
मियावाकी तंत्रज्ञानाने वृक्षलागवड
अकीरा मियावाकी या जपानी तंत्रज्ञान पद्धतीने टेकडीवर मागील वर्षी वृक्षलागवड करण्यात आली आहे. या पद्धतीमध्ये जैवविविधता राखण्यासाठी स्थानिक झाडे जवळजवळ लावली जातात. ह्याने होणारे फायदे असे झाडे मातीतून घेत असलेल्या पोषणाबाबत परस्परपुरक वातावरण तयार होते आणि झाडे जवळजवळ लावल्याने वाढीच्या बाबतीत (जमीनीवर फांद्यांची आणि खाली मुळांची वाढ) स्पर्धा केल्याने जलद वाढ होते.(आपण मोठ्या बिल्डींगशेजारी उगविलेले झाड पहिले असेल तर ही गोष्ट लगेच लक्षात येते. ही पद्धती शोधणाऱ्या अकीरा मियावाकी या जपानी गृहस्थांचा दावा असा आहे की या जंगलातील आपण लावलेल्या सहा इंच ते दोन फूटी रोपांना वणवा, चराई पासून जपले आणि पाणी घालत राहिले तर केवळ तीन वर्षात १०-१२ फुटांहून जास्त उंच वाढतात आणि पाण्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झाल्यामुळे नंतर त्यांना काहीही धोका नसतो. टेकडीला अतीवृष्टी किवा इतर माळीन सारख्या नैसर्गिक आपत्तीपासून दूर ठेवण्याकामी हे तंत्रज्ञान नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
*सोशल मिडिया वापर*
वसुंधरा अभियान हे पूर्णपणे निसर्गसंवर्धनाचे असले तरी या मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा सर्वांचा ताळमेळ घालण्यासाठी मोठ्या खुबीने करण्यात आला आहे. अभियानाची माहिती सर्वसामान्य लोकांना व्हावी आणि इतरांनीही प्रेरणा घ्यावी यासाठी अभियानाचे फेसबुक पेज तयार केले गेले आहे. कोणतीही संस्था म्हटली कि सर्व प्रथम डोळ्यासमोर येतो तो आर्थिक गैरव्यवहार आणि हाच मुख्य मुद्दा या अभियानाने निकाली काढला आहे व्हाट्सएपच्या माध्यमातून. अभियानाला कोणतीही सरकारी मदत नसली तरीही काही निसर्गप्रेमी व्यक्ती या वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस किंवा इतर कोणत्याही प्रसंगी वृक्षारोपणासाठी निधी देतात. या निधीची पावती लगेच व्हाट्सएप ग्रुप वरती टाकली जाते आणि केलेला खर्च देखील व्हाट्सएपवर सर्वाना पाहण्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे साहजिकच वसुंधरा अभियान हे सुसाट सुटले आहे कारण आहे या अभियानाचा पारदर्शीपणा. सोशल मिडिया च्या वापरने कामाचे नियोजन करणे सोपे जाते.
*प्रेरणा*
कोणतेही कार्य हे फळाला गेले कि ते इतरांना प्रेरक ठरते असेच काहीसे वसुंधरा अभियान बाणेरच्या बाबत झाले आहे. चहूकडे दिसणारी हिरवळ, दुर्लभ होत जाणाऱ्या वनस्पती यामुळे साहजिकच लोकांचा ओढा या टेकडीकडे वाढला असून ,१ बीएचकेच्या घरात कोंडलेल्या वातावरणातून बाहेरच्या वातावरणात सकाळी मोकळा श्वास घेण्यासाठी सर्वांची येथे वर्दळ वाढली आहे आणि यासोबतच काही विघातक कामे सुद्धा त्यामुळे झाडांची मोडतोड करणे , साहित्य चोराने ई. मुळे सदस्यांना मनस्ताप होतो परंतु वाईटापेक्षा चांगल्या लोकांची संख्या टेकडीवर अधिक असल्याने याही समस्येवर मत होत आहे. वसुंधरा टीमच्या याच प्रेरक कार्याची दखल घेत आज बरेचसे सर्वसामन्य लोक आपल्या वाढदिवस किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यावर विनाकारण केला जाणारा खर्च टाळून टेकडीवर वृक्षारोपण करण्यास प्राधान्य देतात. हेच *_वसूंधरा_* चे कार्य इतर राज्यात ठिकाणी सुद्धा प्रेरक नक्कीच ठरेल .

See also  ‘मिशन समर्थ’ अंतर्गत महानिर्मितीच्या जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन : जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे