पुणे : जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेले महिलांसाठीचे “पिंक बस” स्वच्छतागृह बंद अवस्थेत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. महिलांसाठी पुरेशा स्वच्छतागृहांच्या अभावामुळे वारंवार टीका आणि आंदोलन होत असताना पुणे महापालिकेने सुरू केलेला हा उपक्रम सकारात्मक वाटत असला तरी प्रत्यक्षात सुविधा बंद असल्याने त्याचा उपयोग होत नसल्याचे समोर आले आहे.
क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी याबाबत पुणे मनपा आयुक्त मा. नवलकिशोर राम यांना निवेदन दिले आहे.
शहरातील एकूण ११ “पिंक बस” स्वच्छतागृहांसाठी निविदा प्रक्रिया राबवून त्या “पे अँड यूज” तत्वावर मे. सारा प्लास्ट प्रा. लि. यांना चालविण्यास देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महिलांकडून प्रती वापर पाच रुपये शुल्क घेऊन या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यांची देखभाल संबंधित संस्थेकडून करण्यात येणार आहे. यासाठी सुमारे ९० लाख रुपयांचा खर्च करण्यात येत आहे.
सध्या शनिवाऱवाडा परिसरातील एक बस कार्यरत असली तरी छत्रपती संभाजी उद्यान आणि कात्रज उद्यान येथे उभ्या असलेल्या बसेसना पाणी व ड्रेनेज कनेक्शन नसल्याने त्या बंद अवस्थेत असल्याचे त्यांनी नमूद केले. इतर काही बसेसही पुढील काळात वापरात येणार असल्याने प्रशासनाने आवश्यक सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिलांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच पुण्याची सुसंस्कृत शहर म्हणून ओळख अधिक बळकट करण्यासाठी मनपा प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केली आहे.















