नगरसेवकांच्या निधी वर्गीकरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे महापालिका भवनात आंदोलन

पुणे : पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी प्रस्तावित निधीचे वर्गीकरण करून दोन्ही नगरसेवकांना शून्य निधी करण्यात आल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुणे महापालिका भवनात आंदोलन करण्यात आले.

या निर्णयामुळे दोन्ही प्रभागांतील रस्ते, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा तसेच अन्य मूलभूत विकासकामांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आंदोलकांनी सांगितले. विकासकामांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी राजकीय भेदभावातून वर्गीकृत करण्याऐवजी नागरिकांच्या गरजा आणि प्रभागाच्या विकासाला प्राधान्य देऊन उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची भेट घेऊन निवेदन दिले. निधी वर्गीकरणाची संपूर्ण बाब आयुक्तांच्या निदर्शनास आणून देत अमोल बालवडकर आणि सुहास टिंगरे यांच्या प्रभागातील प्रस्तावित विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

त्यानंतर महापालिका भवनातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, सुभाष जगताप, आमदार चेतन तुपे आणि विरोधी पक्षनेते निलेश निकम यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत निधी वर्गीकरणाच्या निर्णयाचा निषेध केला. यावेळी घोषणाबाजी करत पक्षाच्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

आंदोलनात माजी उपमहापौर दीपक मानकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेवक सुहास टिंगरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

‘विकासकामांचा निधी हा राजकीय भेदभावाचा विषय न बनवता नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रभागाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवून उपलब्ध करून द्यावा. दोन्ही नगरसेवकांना शून्य निधी करण्याचा निर्णय मागे घेऊन प्रभागातील विकासकामांसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा,’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.

See also  यश्विन 2.0 सोसायटी सुस येथे "राईट टू वोट" जनजागृती व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे गणेशोत्सवानिमित्त आयोजन