महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत एमसीए ब्लु संघाची विजयी सलामी  

पुणे : – महाराष्ट्र क्रिकेट संघटना (एमसीए) आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल) स्पर्धेच्या दरम्यान आजपासून सुरु झालेल्या महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत पहिल्या सामन्यात शिवाली शिंदे हिने केलेल्या नाबाद ३५ धावांच्या खेळीच्या जोरावर एमसीए ब्लु संघाने एमसीए यलो संघावर डक वर्थ लुईस नियमानुसार २२ धावांनी विजय मिळवत शानदार सुरुवात केली.    

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहूंजे येथील स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेत महिलांच्या प्रदर्शनीय लढतीत पहिल्या सामन्यात पावसामुळे दोन्ही संघातील सामना प्रत्येकी १५ षटकांचा खेळविण्यात आला. यलो संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यलो संघाच्या चिन्मयी बोरपाळेने स्मृती मानधनाला झेल बाद करून ब्लु संघाला पहिला धक्का दिला. पूनम खेमनारने स्मृतीचा झेल टिपला.   

ब्लु संघ ७.३ षटकात १ बाद ५७ धावावर असताना पुन्हा पाऊस सुरु झाला व त्यामुळे सामना थांबविण्यात आला. पुन्हा पावसाच्या व्यत्ययामुळे दोन्ही संघातील सामना प्रत्येकी ९ षटकांचा करण्यात आला. याआधी शिवाली शिंदेने २८ चेंडूत ५ चौकारासह नाबाद ३५ धावा, तर ऋतुजा देशमुखने २१ चेंडूत २ चौंकारांसह २३ धावा केल्या. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी ४३ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. पावसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा खेळ सुरु झाल्यावर ऋतुजा देशमुखला धावचीत बाद केले. ब्लु संघाने ९ षटकात ३ बाद ६६धावा केल्या. परंतु डक वर्थ लुईस नियमानुसार यलो संघाला विजयासाठी ९ षटकात ७७ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. 

७७ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या एमसीए यलो संघाला ९ षटकात ४बाद  ५४ धावाच करता आल्या. यात कर्णधार तेजल हसबनीस १० धावांवर खेळत असताना ब्लु संघाच्या प्रियांका गारखेडेने त्रिफळा बाद केले व यलो संघाला पहिला धक्का दिला.  त्यानंतर मुक्ता मगरे(१६धावा), इशा घुले(१९धावा) यांनी दिलेली लढत अपुरी ठरली. ब्लु संघाकडून प्रियांका गारखेडे(१-७), माया सोनावणे(१-८), श्वेता सावंत(१-१०), श्रद्धा पोखरकर(१-१३) यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला २२ धावांनी विजय मिळवला.        
दुसरा सामना मंगळवार, २७ जून रोजी एमसीए यलो संघ विरुद्ध एमसीए रेड संघ यांच्यात दुपारी १.३० वाजता होणार आहे. 

See also  पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण कार्यक्रमांतर्गत खेळाडूंना मिळणार आर्थिक साहाय्य

सविस्तर निकाल: एमसीए ब्लु संघ: ९ षटकात ३बाद ६६ धावा (शिवाली शिंदे नाबाद ३५(२८,५x४), ऋतुजा देशमुख २३(२१,२x४), मुक्ता मगरे १-१३, चिन्मयी बोरपाळे १-१८) वि.वि. एमसीए यलो संघ: ९ षटकात ४बाद ५४धावा (ईशा घुले १९, मुक्ता मगरे १६, तेजल हसबनीस १०,  प्रियांका गारखेडे १-७, माया सोनावणे १-८, श्वेता सावंत १-१०, श्रद्धा पोखरकर १-१३); सामनावीर – शिवाली शिंदे; एमसीए ब्लु संघ २२ धावांनी विजयी.