केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाची मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालयांना भेट

पुणे : राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत २०२५ पर्यंत देशातून क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले असून याबाबत आढावा घेण्याकरीता आलेल्या केंद्र शासनाच्या क्षयरोग पथकाने मावळ, खेड व दौंड तालुक्यातील खासगी रुग्णालये, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांना भेटी देवून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांनीदेखील जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी व जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक घेतली. खासगी क्षेत्रातील क्षयरुग्ण नोंदी वाढविणे, खासगी व्यवसायीकांना कामकाजाबाबत पत्र देवून अनुदान वेळेत वितरित करावे, राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रमांतर्गत संबंधितांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी दिल्या.

राष्ट्रीय क्षयरोग निवारण कार्यक्रम सर्व शासकीय आरोग्य संस्थेमार्फत राबवला जातो. याअंतर्गत जास्तीत जास्त क्षयरुग्णांची नोंदणी करून तपासणी व नोंदणी केली जाते. रुग्ण काही वेळेस उपचार घेण्यास टाळाटाळ करतात व उपचार पूर्ण न केल्यास क्षय रुग्णाला धोकादायक स्थितीला सामोरे जावे लागते. परिणामी महागडी औषधे घ्यावी लागतात व त्यानंतर तो नियमित औषधोपचारांना दाद देत नाही. हे लक्षात घेता अभियानास बळकटी येण्याकरीता खासगी क्षेत्रातील डॉक्टर्स, खासगी प्रयोगशाळा, खासगी औषधविक्रेते यांचा सहभाग घेण्यात येत आहे.

See also  सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार - नामदार चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन