२ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच- कृषि आयुक्त सुनील चव्हाण

पुणे : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २ हजार ७० पदांच्या भरतीसाठी प्रस्ताव शासनाकडे देण्यात आला असून शासनाची मान्यता प्राप्त होताच जाहिरात व पुढील कार्यवाही केली जाईल, अशी माहिती राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली आहे.

श्री. चव्हाण यांनी पुढे माहिती दिली, कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त गट-क मधील विविध संवर्गातील सरळसेवा पदभरती बाबत प्रक्रिया सुरु झाली असून त्याची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच पेसा क्षेत्रातील पदे निश्चित करण्याची कार्यवाही देखील अंतिम टप्प्यात आहे.

कृषि विभागाचा सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झाला नसल्यामूळे शासन निर्णयातील तरतूदीनुसार वाहनचालक व गट-ड संवर्गातील पदे वगळून इतर सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादीत पदभरती करण्यात येणार आहे. गट- क संवर्गातील सरळसेवा पदभरती आय. बी. पी. एस. या कंपनीमार्फत राबविण्यास शासन मान्यता मिळाली आहे. या संस्थेसोबत सामंजस्य करार देखील करण्यात आला आहे. त्यानुसार वरिष्ठ लिपिक, सहायक अधिक्षक, लघुलेखक ( निम्नश्रेणी) व लघुलेखक (उच्चश्रेणी) या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

पेसा क्षेत्रातील पदे भरणार
राज्यपाल महोदयांच्या २९ ऑगस्ट २०१९ च्या अधिसूचनेनुसार अनूसुचित / आदिवासी क्षेत्रातील (पेसा) १७ संवर्गातील सरळसेवेची पदे भरणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यामध्ये कृषि सहायक संवर्गाचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार विभागीय कृषि सहसंचालक ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर व लातूर या विभागातील पेसा क्षेत्रातील मुख्यालय निश्चिती व पदसंख्या निश्चित करण्याबाबतच्या प्रस्तावास प्रशासकीय विभागाची मान्यता प्राप्त करुन घेणेबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कृषी सेवक पदांसाठी जाहिरात देणे शक्य झालेले नाही, मात्र मान्यता मिळताच भरती संदर्भातील पुढील कार्यवाही केली जाईल, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले.

See also  अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबाद येथे घ्यावी; यंदाचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन ‘घरोघरी तिरंगा’ फडकवून साजरा करावा – मंत्री धनंजय मुंडे