नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

पुणे : शनिवारपासून जिल्ह्यातील काही भागात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला असला तरीही पावसाची अनिश्चितता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज केले.

बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांची पाण्याची टंचाई सोडविण्यासाठी पालकमंत्री श्री. पाटील यांनी लोकसहभागातून तीन महिने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला होता. या उपक्रमाचा बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील अनेक सोसायटीतील नागरिकांनी लाभ झाला. त्याबद्दल पाषाण-सूस रोडवरील माऊंट युनिक गृहनिर्माण संस्थेच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, रोहन कोकाटे, विवेक मेथा यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी आणि रहिवासी उपस्थित होते.

श्री.पाटील म्हणाले, शहरातील  नागरिकांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून समान पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांसाठीची योजना कार्यान्वित करण्यात आली. ही योजना कार्यान्वित होण्यासाठी महापालिकेने कठोर परिश्रम घेतले आहेत.

ते पुढे म्हणाले , समान पाणीपुरवठा योजनेचे टप्पे पूर्ण होत असताना काही अडथळे ही पार करावे लागत आहेत. यंदा उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाई जाणवू लागल्यानंतर कोथरूड बाणेर- बालेवाडी- पाषाणमधील नागरिकांसाठी लोकसहभागातून टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला होता. शनिवारपासून पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात पाऊस समाधानकारक झाला, तर भविष्यातील पाणीटंचाईची समस्या संपेल.

वाढते शहरीकरण आणि बदलत्या निसर्गचक्रामुळे पाण्याचे स्त्रोत अपूरे पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याचे योग्य नियोजन करावे. अनेक ठिकाणी पिण्याचे पाणी गाड्या धुणे किंवा बांधकामांसाठी वापरले जाते. त्यामुळे पाण्याचा हा अपव्यय टाळला पाहिजे. तसेच, सोसायटींनीही पावसाचे पाणी संकलित करून, रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प सोसायटी भागात कार्यान्वित करावेत, तसेच कचऱ्याची निर्गत, सौर ऊर्जा प्रकल्प आदींद्वारे स्वावलंबी बनावे असे आवाहन त्यांनी केले.

See also  कोथरूड मैत्री व्यासपीठ आयोजित सर्वपक्षीय स्नेहमेळाव्यात बहरला मैत्रीचा रंग !