भारतीय चिकित्सा पद्धतींचे एकीकरण देशाला स्वस्थ व सक्षम बनवेल
राष्ट्रीय आयोगाचे वैद्य जयंत देवपुजारी यांचे प्रतिपादन; आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या महाराष्ट्रातील नोंदणीचा शुभारंभ

पुणे : “भारतीय चिकित्सा पद्धतीमध्ये वैविध्यता, क्षमता आणि समृद्धता आहे. त्यामुळेच जगभरात आपल्या चिकित्सा पद्धतीला मोठी मागणी आहे. देशाला स्वस्थ, सक्षम बनवण्यासाठी भारतीय चिकित्सा पद्धतींचे एकीकरण आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देणे क्रमप्राप्त आहे,” असे प्रतिपादन भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी यांनी केले. आयुर्वेद, युनानी, होमिपॅथी व अन्य चिकित्सा पद्धतींनी एकमेकांच्या हातात हात घालून काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या (एनसीआयएसएम) बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशन आणि नॅशनल कमिशन फॉर होमियोपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने आयुष मंत्रालयाच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या महाराष्ट्रातील नोंदणी अभियानाचा शुभारंभ वैद्य देवपुजारी यांच्या हस्ते झाला.

कोंढवा रस्त्यावरील वर्धमान सांस्कृतिक भवनात झालेल्या सोहळ्यात आयोगाच्या बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे चेअरमन वैद्य राकेश शर्मा, श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्टचे अध्यक्ष श्री सदगुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर, नॅशनल कमिशन फॉर होमियोपॅथीचे अध्यक्ष डॉ. अनिल खुराणा, बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाकीन त्रिवेदी, रुकडीकर ट्रस्टचे मुख्य सल्लागार व विश्वस्त वैद्य समीर जमदग्नी, वैद्य रामदास आव्हाड, महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनचे अधिष्ठाता डॉ. डी. यु. वांगे, निमा महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष वैद्य तुषार सूर्यवंशी, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वीणा पाटील, बोर्ड ऑफ एथिक्स अँड रजिस्ट्रेशनच्या सदस्या डॉ. रजनी नायर आदी उपस्थित होते. यावेळी श्री सदगुरु विश्वनाथ महाराज रूकडीकर ट्रस्ट कोल्हापूर आणि श्री विश्ववती आयुर्वेदीय चिकित्सालय व रिसर्च सेंटर कोल्हापूर आयोजित श्री विश्वव्याख्यानमालेअंतर्गत भव्य आयुर्वेद प्रदर्शनाचे, आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

वैद्य जयंत देवपुजारी म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाची ‘व्हिजिबिलिटी’ अत्यंत महत्वाची आहे. देशातील सर्व आयुष प्रॅक्टिशनर्सना केंद्रीय व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम आहे. आयुर्वेद, युनानी प्राचीन काळापासून महत्वपूर्ण राहिले आहे. भारतीय चिकित्सेला जगभरात मोठी मागणी आहे. आज जवळपास १३५०० भारतीय परदेशात प्रॅक्टिस करत आहेत. आधारकार्ड, मोबाईलचा वापर जसा लोकप्रिय झाला, तसाच आयुष्मान भारत डिजिटल मिशन आपल्या सर्वाना एकत्रिपणे लोकाभिमुख करायचे आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता सार्वत्रिक होण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशावेळी आपण तंत्रज्ञानाला अनुसरून काम केले नाही, तर त्याचा फटका आपल्याला बसणार आहे.”

डॉ. अनिल खुराणा म्हणाले, “आयुष अंतर्गत कार्यरत डॉक्टरांना एकाच डिजिटल व्यासपीठावर आणण्याचा हा अनोखा उपक्रम आहे. रुग्णांना आयुष्मान भारत हेल्थकार्ड दिले जात असून, त्यांच्या सेवेसाठी हेल्थकेअर प्रोफेशनलची मोठी गरज आहे. देशात आयुष चिकित्सा पद्धती वापरणाऱ्यांची संख्या नऊ लाख आहे. मात्र, डिजिटल मिशनमध्ये केवळ ६० हजार नोंदणी झाले आहे. याचा विचार करून अधिकाधिक नोंदणी होणे गरजेचे आहे.”

श्री सद्गुरू आनंदनाथ महाराज सांगवडेकर म्हणाले, “भारताला आयुर्वेदाची समृद्ध परंपरा आहे. एकीचे बळ भारतीय संस्कृतीत अधोरेखित झालेले आपण पाहतो. युवा शक्ती असलेला भारत देश सक्षम व स्वस्थ व्हायचा असेल, तर सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे. सर्व पॅथींनी एकत्र येऊन नवीन संशोधन, शास्त्राचे अविष्कार करावेत. ज्यातून भारताला अधिक समृद्ध, सक्षम व स्वस्थ बनवता येईल.”

वैद्य राकेश शर्मा यांनी प्रास्ताविकात ‘एनसीआयएसएम’च्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या आयुष्मान भारत डिजिटल मिशनच्या नोंदणी अभियानाची माहिती दिली. तसेच आयुष अंतर्गत प्रॅक्टिस करणाऱ्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले. आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत महाराष्ट्रातील आयुष विभागातील सुमारे २००० डॉक्टरांची नोंदणी यावेळी करण्यात आली.

वैद्य प्रसाद पांडकर यांनी रुकडीकर ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. वैद्य परेश देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डॉ. पिनाकीन त्रिवेदी यांनी आभार मानले.

See also  जागतिक परिचारिका दिना निम्मित नाईटयंगल पुरस्काराचे वितरण.