पाषाण मधील अनुदानित शाळेची जागा व्यापारी करण्यासाठी शाळा बंद करण्याचा घाट; शासनाचे अधिकारी सामील असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पाषाण : पाषाण गावातील नेहरू शिक्षण संस्थेची गोरा कुंभार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालय बंद करण्याचा डाव संस्थाचालकांनी केला आहे. त्यामुळे पाषाणमधील विद्यार्थ्यांना मराठी शाळेतील शिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे. याला विरोध करत ग्रामस्थांनी, माजी विद्यार्थ्यांनी शाळा वाचवण्यासाठी सह्यांची मोहीम सुरू केली आहे. विशेष बाब म्हणजे शासनाचा शिक्षण विभाग देखील शाळा बंद करण्यासाठी अपेक्षित सहकार्य करून पाठिंबा देत आहे. शाळेमध्ये मुले ऍडमिशन घेण्यासाठी तयार असताना देखील ऍडमिशन प्रक्रिया राबवली जात नाही.

पाषाण येथे मराठी माध्यम ची अनुदानित अशी एकमेव शाळा असलेली गोरा कुंभार हायस्कूल बंद करण्याचा घाट घालण्याची सुरू आहे. या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, सुस नांदे परिसरातील मुलांना घेता येत होते. त्याशिवाय अनुदानित शाळा असल्याने फी चा त्रासही मुलांना नव्हता. परंतु ही शाळा बंद करून या ठिकाणी दुकाने थाटल्याने आता येथील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण होणार आहे.

शिक्षण अधिकारी सुनंदा वाखारे यांच्या निदर्शनास नागरिकांनी तसेच शाळेतील शिक्षकांनी देखील अनेक चुकीच्या बाबी उघड केल्यानंतर देखील यावर कारवाई होत नाही. याउलट सदर शाळेत ऍडमिशन होत नसल्याचे बनाव तयार करून शाळा बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शाळेची बाजारपेठेतील मोक्याची जागा विकण्याचा घाट संस्थाचालक घालत असून शिक्षण अधिकारी देखील यात सामील असल्याचे आरोप स्थानिक ग्रामस्थ व नागरिक करत आहेत.

याबाबत माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांनी सांगितले की, शाळा बंद करण्याच्या या बेकायदेशीर कृतीचा निषेध करुन शाळा वाचविण्यासाठी सह्यांची मोहिम चालू केली आहे. याचबरोबर शाळा वाचवण्यासाठी न्यायालयीन लढा देणार आहे. शाळा बंद करून दुकाने थाटली जातात याकडे शिक्षण अधिकारी का लक्ष देत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

See also  एचए हायस्कूलची प्रीत पाटील आणि मिसबा शेख याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश